
सांगली, ता.१६: सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या शहर स्वच्छतेसाठी ६ अत्याधुनिक मशीन दाखल झाल्या आहेत. यामध्ये ५ व्हेईकल माउंटेड गारबेज सक्शन मशीन आणि १ हाय कॅपॅसिटी सक्शन अँड जेटिंग मशीनचा समावेश आहे. या मशीनच्या साहाय्याने शहरातील स्वच्छता अधिक प्रभावी आणि सुरक्षित होणार आहे.
नगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी या मशीनचे प्रात्यक्षिक पाहून त्या लवकरच मनपाच्या सेवेत दाखल करण्याचे निर्देश दिले. या मशीनमुळे शहरातील लिटर पिकर आणि वॉटर रिसायकलिंगची सुविधा वाढणार आहे.
या अत्याधुनिक मशीनच्या साहाय्याने शहरातील स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित होणार आहे. लिटर पिकरमुळे शहरातील आठवडा बाजार, रस्त्याच्या बाजूला पडणारा कचरा आणि जीव्ही पॉईंट्स स्वच्छ ठेवले जातील. जेटिंग मशीनमुळे मलवाहिन्या आणि भूमिगत गटारांची स्वच्छता अधिक सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेने होईल. या मशीनला वॉटर रिसायकलिंग सुविधा असल्याने पाण्याची बचतही होणार आहे.
महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी संबंधितांना मशीनचा योग्य आणि प्रभावी वापर करण्याच्या सूचना दिल्या. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील, कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, विनायक जाधव, सहायक आयुक्त तथा मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी, स्वच्छता निरीक्षक आणि संबंधित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.