
मुबई, ता.१७: राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच (टाईप प्लॅन) बांधणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
नगरपरिषदा व नगरपंचायत, पदाधिकारी तसेच अधिकारी व कर्मचारी यांची संख्या व शहरांची लोकसंख्या विचारात घेऊन नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचा नमुना नकाशा (Type Plan) सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य वास्तुशास्त्रज्ञ यांच्याकडून मंजूर करुन घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींनी नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम या नमुना नकाशाप्रमाणे करणे बंधनकारक असणार आहे. नागरिकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे, त्यांच्या तक्रारीचे वेळेत निराकरण करणे, वाढत्या संगणकीकरणामुळे सर्व नगरपरिषदा- नगरपंचायतीमध्ये अद्ययावत ई-कार्यप्रणालीचा संपूर्ण राज्यात अवलंब होण्यासाठी प्रशासकीय इमारतींमध्ये आवश्यक असणाऱ्या बाबींचा समावेश व्हावा यासाठी हा नमुना नकाशा तयार करण्यात आला आहे.