
कुपवाड, ता.१२: “सरकारी नोकरीच्या आमिषाने तरुणाला लुटले; दिलेल्या पैशाची मागणी केल्याने तरुणावर खुनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी (ता.९) रोजी सायंकाळी साडे सातच्या दरम्यान घडली आहे. संशयित आरोपी ज्ञानोबा ढोबळे यांनी हल्ला केला असून देवानंद वसगडे हे गंभीर जखमी झाले आहेत.वसगडे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांचावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वसगडे यांचा मुलगा ओंकार वसगडे वय २७ वर्ष , रा. शिवाजी नगर बामणोली यांने कुपवाड पोलीसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुपवाड अवधूत कॉलनी येथे अमोल ढोबळे याने ओंकार वसगडे याला रेल्वे किंवा आरोग्य खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून वसगडे यांच्याकडून ऑनलाइन साडे पाच लाख व रोख रक्कम पन्नास असे एकूण सहा लाख रुपयांची रक्कम वसगडे परिवरांकडून अमोल ढोबळेनी घेतली. पैसे घेऊन पण नोकरी मिळाली नाही व फोन केले असता फोन उचलत नसल्याने देवानंद वसगडे यांनी मंगळवारी (ता.९) रोजी सायंकाळी अमोल ढोबळे यांच्या घरी गेले आणि अमोलचे वडील ज्ञानोबा ढोबळे यांना म्हणाले की, तुमचा मुलगा अमोल फोन उचलत नाही. त्याच्याकडे दुसरा नंबर असेल तर तो द्या. अमोलचा नंबर कशाला पाहिजे असे ज्ञानोबा ढोबळे यांनी देवानंद वसगडे यांना विचरले तुमचा मुलगा अमोल ढोबळे याने माझ्या मुलास सरकारी नोकरीचे अमिष दाखवून रोख रक्कम ५० हजार रुपये घरामध्ये दिलेले आहेत व ऑनलाईन गुगल पे व फोन पे असे साडेपाच लाख रुपये असे एकूण सहा लाख रुपये घेतले होते. ती रक्कम अद्याप पर्यंत दिलेली नाही असे सांगितले असता आरोपी ज्ञानोबा ढोबळे यांनी दिलेली रक्कम आम्हास विचारून दिली आहे का असे म्हणून फिर्यादीचे वडिल देवानंद वसगडे यांच्या डोक्यात काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यांची प्रकृती चिंताजनक जनक असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. सदर घटनेची नोंद कुपवाड पोलीसांत झाली आहे. हल्ला करणारा संशयित आरोपी ज्ञानोबा ढोबळे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक चौकशीत या फसवणुकीचा जाळे पसरले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अनेकांनी अमोल ढोबळेकडून अशाच पद्धतीने पैसे दिल्याची शंका आहे. त्यामुळे या प्रकरणाचे स्वरूप गंभीर असून, फसवणूक झालेल्यांनी तत्काळ कुपवाड MIDC पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कुपवाड पोलीस प्रभारी अधिकारी दीपक भांडवलकर यांनी केले आहे.या पुढील अधिक तपास कुपवाड पोलीस करत आहेत.