
मिरज, ता.९: तालुक्यातील बोलवाड येथील अंगणवाडी क्रमांक १०८ व १०९ ठिकाणी बोलवाडचे विद्यमान उपसरपंच सचिन दादा कांबळे यांनी स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. अंगणवाडी परिसरात काही लोक अस्वच्छता करत असल्याचे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या निदर्शनास येत होते. लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही कॅमेरे बसविणे गरजेचे असल्याने अंगणवाडी सेविका यांनी ग्रामपंचायत कडे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देण्याची मागणी केली होती. परंतु ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी असल्याने व करवसुली चे प्रमाण कमी असल्या कारणामुळे ग्रामपंचायत निधीतून अथवा इतर निधीतून तरतूद करून कॅमेरे बसवणे शक्य नव्हते. उपसरपंच सचिन दादा कांबळे यांनी लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ स्वखर्चाने तीन सीसीटीव्ही कॅमरे बसवून दिले. त्याचे उद्घाटन मिरज ग्रामीण पोलिस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलिस निरीक्षक अजित सिद यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलवाड गावच्या सरपंच, सौ. निगार शेख, उपसरपंच सचिन दादा कांबळे, सदस्या सौ.वंदना खोत, पूजा नाईक, पुष्पवती पाटील, शहनाज हवालदार, ग्रामपंचायत अधिकारी दुर्गाडे मॅडम, सुभाषनगर टाकळी बोलवाड चे बीट हवालदार अमोल ढोले, सोसायटीचे माजी चेअरमन प्रवीण पाटील, राजकुमार पाटील, बोलवाड चे माजी सरपंच जितेंद्र पाटील, शाळेचे मुखाध्यापक विजय कुरणे सर, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष सतीश गस्ते, हरून भाई शेख, ज्येष्ठ नागरिक रमजान चाचा शेख ,सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच गावातील नागरिक उपस्थितीत होते.