
सांगली, ता.३० : भाविकांना, वारकऱ्यांना आषाढी एकादशीच्या काळात पथकरातून सूट देण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथे पास सुविधा उपलब्ध आहे. भाविकांनी, वारकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. पास मिळवण्यासाठी वैध वाहनाचे नोंदणी पुस्तक सोबत घेवून यावे, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आकाश गालिंदे यांनी केले आहे.
आषाढी वारीमधील १० मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे पथकर स्थानकांवर मानाच्या पालख्यांना व वारकरी तसेच भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्याबाबत दिनांक १६ जून २०२१ च्या शासन परिपत्रकात निर्देशित केलेले आहे. दि. १८ जून २०२५ ते १० जुलै २०२५ या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या-येणाऱ्या वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठीच पथकरातून सूट देण्यासाठी आषाढी एकादशी २०२५ करिता विहित केलेल्या नमुन्यात सवलत प्रवेशपत्र जारी करण्यात आले.