
सांगली, ता. २६ : सततच्या वादाला कंटाळून पतीने पत्नीचा बांबूने खून केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना गुरुवार (ता.२६) रोजी पहाटे घडली. पत्नीच्या डोक्यात लाकडी बांबूने मारहाण करीत पतीने खून केला. शिलवंती पिंटू पाटील (वय ३०, रा. राजर्षी शाहूनगर, विजयनगर, सांगली) असे मयत पत्नीचे नाव आहे. या घटनेनंतर संशयित पती पिंटू पाटील हा त्याचा दोन मुलांना घेऊन पसार झाला. पिंटू पाटील हा व्यवसायने गवंडी कामगार असून तो मूळचा मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावचा रहिवासी असून कामानिमित्त तो पत्नीसोबत विजयनगरजवळील राजर्षी शाहूनगर, सांगली राहत होता. मंगळवेढा परिसरात पतीच्या शोधासाठी संजय नगर पोलिसांचे पथक रवाना झाले.
पोलिसांची अधिक माहिती अशी की, पती पिंटू पाटील गवंड्याच्या हाताखाली मजुरी करतो. गेल्या काही वर्षापासून तो सांगलीत वास्तव्यास आहे. सांगलीत हनुमाननगरमध्ये स्थायिक असलेल्या शिलवंतीशी पिंटूचा विवाह झाला होता. रत्नदीप कारंडे यांच्या बंगल्याचे काम चालू होते. तेथे देखरेखीसाठी असलेल्या शेडमध्ये पिंटू पाटील व शिलवंती दोन मुलांसह राहत होते. शिलवंती ही बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारायचे काम करत होती. काही दिवसांपासून पिंटू आणि शिलवंती यांच्यात किरकोळ कारणांवरून सतत वाद होता. या वादास कंटाळून शिलवंती दि. १३ जून रोजी घर सोडून निघून गेली होती. याबाबत पिंटूने संजयनगर पोलिसात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. शिलवंती ही पुण्याजवळ बहिणीकडे गेली होती. शनिवारी ती पतीकडे परत आली होती. पत्नी शिलवंती घरी परत आल्याचे पोलिसांना माहिती सांगितले नाही. पती आल्यानंतर ही दोघा पती-पत्नीत वारंवार वादावादी होत होती. गुरूवारी पहाटेच्या सुमारास पिंटूने बांबूने शिलवंतीच्या डोक्यात मारहाण करून तिचा खून केला. खुनकरून दोघा मुलास संगति घेऊन पिंटू पसार झाला. घडलेल्या सर्व प्रकार पिंटूने सांगोल्यातील ओळखीच्या व्यक्तीला सांगितला. सदर व्यक्तीने त्वरित माहिती संजयनगर पोलिसांना कळविले. माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे पोनि/ सूरज बिजली व पथक घटनास्थळी धाव घेत पाहणी व पंचनामा करून मृतदेह शेवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. सांगली पोलिस उपअधीक्षक विमला एम. यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. पोनि/ सुरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले. या घटनेची नोंद संजयनगर पोलीसांत झाली आहे. यापुढील अधिक तपास संजयनगर पोलीस करीत आहे.