चॅप्टर केसेस तरतुदी, कार्यपद्धती प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

फौजदारी प्रकरणातील कार्यवाहीबाबत महसूल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण स्तुत्व – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
सांगली, ता.२० : फौजदारी प्रकरणातील कार्यवाहीबाबत महसूल अधिकाऱ्यांचे आयोजित प्रशिक्षण हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. यामुळे अधिकाऱ्यांच्या ज्ञानात अधिक भर पडण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे मार्गदर्शन करताना केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील तरतुदींनुसार ‘चॅप्टर केसेस’ (प्रतिबंधात्मक कारवाई) संदर्भात आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या सांगता सत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी हा अत्यंत चांगला उपक्रम सुरू केल्याबद्दल त्यांचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कौतुक केले.
या दोन प्रशिक्षण दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी, निवासी नायब तहसिलदार यांच्याकरिता चॅप्टर केसेस व कार्यकारी दंडाधिकारी यांचे कर्तव्य व अधिकार संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रतिबंधात्मक कारवाईबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण कार्यशाळेस, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी अजय पवार, उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर (निवृत्त) यांच्यासह उपविभागीय दंडाधिकारी, तहसिलदार, निवासी नायब तहसिलदार उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था भंग परिस्थिती कशी हाताळावी, पोलीस ठाणे तपासणी, मृत्यूच्या कारणांचा पंचनामा, स्फोटक साठा तपासणी, पंचनामा, पोलीस पाटील, ओळख परेड, जमीन-पाणी वाद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 164, चॅप्टर केसेस, प्रतिबंधात्मक कारवाई, एक्सह्युमेशन भा.ना.सु.सं. 2023 कलम 196(4), आभुषणांची ओळख परेड, जबाब, नैसर्गिक न्यायतत्वे, मृत्यूपूर्व जबाब, अकस्मात मृत्यू प्रकरणी चौकशी, सिमाशुल्क कायद्यान्वये तहसिलदारांनी करावयाची कार्यवाही, दंडाधिकारीय चौकशी याबाबत उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर (निवृत्त) यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.