
सांगली, ता.२० : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सांगली व बी. ओ. आय. स्टार सांगली आरसेटी यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथे ३० दिवस “मोबाईल दुरुस्ती आणि सेवा उद्यमी प्रशिक्षण” कार्यशाळा संपन्न झाली. सध्या मोबाईल हा दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग बनला आहे, पण बऱ्याचवेळेला ग्रामीण भागातील नागरिकांना मोबाईल खराब झाला की, तो दुरुस्त करण्यासाठी शहरात जावे लागते. ग्रामीण भागात उद्योगाला चालना देण्यासाठी तसेच अल्पउत्पन्त्र धारक युवक युवतीना ग्रामीण भागात उद्योग व्यवसायाला चालना देण्याचा प्रशिक्षण कार्यशाळेचा मुख्य हेतू आहे. प्रशिक्षणा दरम्यान सर्व मोबाईल संचाच्या दुरुस्तीसाठी थेरी व भरपूर प्रात्यक्षिक सराव या माध्यमातून प्रशिक्षण घेतले गेले.
मिरज येथे झालेल्या प्रशिक्षणाच्या निरोप समारंभ प्रसंगी आरसेटी संचालक महेश पाटील, माजी अग्रणी जिल्हा प्रबंधक राजेंद्र यादव, परीक्षक मिलिंद कुलकर्णी, प्रशिक्षक विवेक कुलकर्णी, प्रशिक्षिका स्वाती मेढेकर यांच्यासह आरसेटी स्टाफ उपस्थित होता. संचालक महेश पाटील यांनी संस्थेअंतर्गत घेण्यात येणारे पुढील प्रस्तावित प्रशिक्षण कार्यक्रम जसे कि फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, महिलांसाठी शिवणकाम / फॅशन डिझायनिंग, टू व्हिलर मेकॅनिक वर्क, सीसीटीव्ही कॅमेरा, आग प्रतिबंधक सुरक्षा अलार्मची सेवा आणि सर्व्हिसिंग, मशरूम/अळंबी लागवड या प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.