
कवटेमहांकाळ, ता. २० : येथील रांजणीच्या कुरणात गणेश राजू शिवपूजेचा (वय २२, खिळेगाव, ता. अथणी, जि. बेळगाव) याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत दिसून आला. याबाबत गुरुवारी (ता. १९) कवठेमहांकाळ पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली. मृतदेह वैधकीय तपासणीसाठी पाठविले असून आत्महत्या की घातपात अहवाल आल्यानंतर कळेल’, असे पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांनी सांगितले
पोलिसांची अधिक माहिती अशी की, गणेश हा खिळेगावपासून एक किमी अंतरावर असलेल्या मंदिरापासून काही अंतरावर शिरूर रस्त्यालगत राहत होता. रांजणी हद्दीतील लक्ष्मी मंदिरानजीक लक्ष्मी माळ कुरणात गणेशचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत पशुपालकांना दिसला. केबलने त्याचे दोन्ही हात बांधले होते. पायाजवळ एक दोरी पडली होती. गणेशच्या छातीवर ‘अण्णा’ असे गोंदले आहे. आसपासच्या लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. ही घटना समजताच जत उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, श्रीमंत करे, अभिजित कासार यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला. या घटनेची माहिती घेण्यासाठी कर्नाटक अथणी पोलिस विष्णू गायकवाड, जमीर डांगे आले होते.