
तासगाव, ता. २०: आळते गावात शेतकऱ्याकडून चार हजाराची लाच स्वीकरताना आळतेच्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. अलीम यासीन मुजावर असे ग्रामसेवकाचे नाव आहे. शेतकऱ्यांच्या शेतात म. गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत विहीर खोदाईचे काम सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यासाठी ग्रामसेवकांनी लाच मागितली होती.
मिळालेल्या माहितीनुसार तासगाव आळते ग्रामपंचायतमधून महात्मा गांधी राष्ट्रीय हमी योजनेतून एका शेतकऱ्याला विहीर मंजूर झाली आहे. त्या विहिरीची खोदाई करण्याची ‘वर्क ऑर्डर’ देण्यासाठी आणि पुढील विहीर पूर्ण होईपर्यंत मदत करण्यासाठी शेतकऱ्याला आळतेचे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अलीम यासीन मुजावर (वय ५०, रा. तासगाव) याने ५ हजार रुपयांची मागणी केली होती. ती तडजोडीनंतर चार हजारावर केली. याबाबत शेतकऱ्याच्या मुलाने सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीवरून चार हजाराची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले व अटक केले. रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सदर कारवाई लाचलुचपत विभागाचे अधीक्षक शिरीष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक अनिल कटके पोलिस निरीक्षक किशोरकुमार खाडे, पोलिस नाईक प्रीतम चौगुले, अजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.