
सांगली, ता.६ : १०० फुटी रोड घाटगे शोरूम जवळ भाजी विक्रेता महेश प्रकाश कांबळे (वय ३९, रा. आंबा चौक, सांगली) याचा गुरुवारी (ता.५) सकाळी सहा वाजता कोयत्याने सपासप वार करून निघृण खून करण्यात आल्याची घटना घडली. महेशकांबळे याच्यावर फिरोज शेख यांच्या खुनाचा आरोप होता. त्या कारणावरून फिरोजच्या मुलगा मुजाहिद शेख व त्याच्या साथीदाराने महेशचा खून केल्याचे पोलिसांचा प्राथमिक संशय असल्याचे सांगितले आहे. याबाबत सांगली शहर पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयित आरोपीचा शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आले आहे. घटना समजताच पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, शहरचे निरीक्षक संजय मोरे, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देवून तपासाच्या सूचना दिल्या.

पोलिस व घटनास्थळावरून मिळाली माहिती अशी, की महेश कांबळे हा कोथिंबीराचा होलसेल व्यापारी होता. फिरोज शेख (संजयनगर) हा त्याचा ओळखीचा होता. शेख याचाही भाजीविक्रीचा व्यवसाय होता. पैसे देण्या-घेण्याच्या कारणातून दोघांत वाद झाला होता. याच वादातून कांबळे याने ३० नोव्हेंबर २०२१ रोजी फिरोज शेख याचा खून केला. त्या घटनेत मुख्य अरोपी कांबळे हाच होता. सन २०२३ मध्ये कांबळे हा जामिनावर बाहेर आला. त्यानंतर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. महेश याने तोच व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू केला होता. वडिलांचा खुनाचा राग असलेले मुजाहिद शेख याने कांबळेच्या काटा काडण्याच्या उद्देशाने कांबळे हा गुरुवारी चारचाकीतून शंभरफुटी मार्गे निघाला असता त्याच्यावर पाळत ठेवून कांबळे सकाळी सहाच्या सुमारास तो लघुशंकेसाठी एका दुचाकीशोरूम समोर थांबला असता मुजाहिद शेख आणि त्याचा साथीदार दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी क्षणात कांबळे याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. डोक्यावर, कपाळावर, पोटावर वर्मी असे आठरा वार झाले. रक्ताच्या थारोळ्यात कांबळे हा पडला. सकाळी सहाची वेळ असल्याने लोक जमा झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कांबळे याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतू उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.