
पुणे, ता.४: शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांना बारामतीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. पी. पुजारी यांनी निर्दोष घोषित केले आहे. मंगळवार (३ जून) पडळकर बारामती न्यायालयात हजर झाले होते. २०२० साली त्यांनी केलेल्या “शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना” या वादग्रस्त वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पडळकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता आणि त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद पालवे यांनी बारामती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्यात चार साक्षीदार तपासण्यात आले. बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला की, पडळकर यांच्यावर दाखल गुन्हा लागू होणाऱ्या कलमांत बसत नाही. त्यांच्या विधानामुळे कोणतीही दंगल झाली नव्हती, ना धार्मिक अथवा जातीय तेढ निर्माण झाला होता. ते विधान वैयक्तिक होते, समुदायाला उद्देशून नव्हते. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत आमदार गोपीचंद पडळकर यांना या खटल्यातून निर्दोष मुक्त केले.