
सांगली, ता.२९ : भारतीय संस्कृतीतील दातृत्वाची भावना वृध्दींगत करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. मृत्यूपश्चात पुण्य कमवायचे असेल तर अवयवदानासारखी दुसरी संधी नाही. मरावे परी अवयवरूपी उरावे, या उक्तीप्रमाणे दान केलेल्या अवयवांच्या माध्यमातून कोणताही नागरिक मृत्युनंतरही जिवंत राहू शकतो. त्यामुळे अवयवदान चळवळीचा सांगली पॅटर्न तयार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले. राज्य शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत शासकीय कार्यालयांमध्ये अवयवदानाची ऐच्छिक चळवळ आगामी चार महिन्यात राबवण्यात येत आहे. अवयवदानासाठी क्यूआर कोड तयार करण्यात आला असून तो मोबाईलवर स्कॅन करून प्राप्त अर्जात माहिती भरल्यास अवयवदानाची नोंद होणार आहे. या क्यू आर कोडचे जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, सांगली व तहसील कार्यालय, मिरज येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते प्रत्यक्ष अनावरण करण्यात आले. आयोजित कार्यक्रमात श्री. काकडे यांनी नागरिकांनी अवयवदान करण्याचे आवाहन केले.
डॉ. हेमा चौधरी
मृत्यू ही प्रत्येकाच्या जीवनात येणारी दुर्देवी घटना असून ती अटळ आहे. मानवतावादी दृष्टीकोनातून जाता जाता दिले जाणारे दान हे गरजू लोकांना उपयोगी पडणार आहे. त्याला जीवनदान मिळणार आहे. मृत्यूनंतर 6 तासाच्या आत अवयवदान करावे लागते. यामध्ये मृत व्यक्तिच्या शरीराला कोणतीही विद्रुपता येत नाही. ब्रेन डेड (मेंदू मृत अवस्थेत) व्यक्तीचे अवयवदान करू शकतो. यासाठी चांगली भावना मनात ठेऊन अवयवदानासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अवयवदानासाठीचे प्रतिज्ञापत्र क्यूआरकोडव्दारे ऑनलाईन पध्दतीने रजिस्ट्रेशन करून अवयवदान चळवळीची सुरूवात स्वत:पासून केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही अवयवदानासाठी क्यूआरकोड स्वतःच्या मोबाईलवर स्कॅन करून रजिस्ट्रेशन केले.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते अवयवदानाची नोंदणी केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रातिनिधीक प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उपक्रमाच्या पहिल्या दिवशी अवयवदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 30 अर्ज, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात 25 अर्जाची नोंदणी झाली.