अमली पदार्थ तस्करांवर कायद्याचा धाक यापुढेही कायम ठेवावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अमली पदार्थ तस्करांवर कायद्याचा धाक यापुढेही कायम ठेवावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ टास्क फोर्सच्या आठव्या बैठकीत घेतला

सांगली, ता.२१ : कायद्याचा धाक, प्रबोधन व पुनर्वसन या त्रिसूत्रीने गेले तीन महिने काम केल्याने जिल्ह्यात अमली पदार्थ संबंधित घटना कमी झाल्या आहेत. मात्र गुन्ह्यांत घट झाली म्हणून कुठल्याही प्रकारे शिथिलता न आणता पोलीस विभागाने यापुढेही कायद्याचा धाक कायम ठेवण्यासाठी नियमित कार्यवाही करावी, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या.अमली पदार्थ टास्क फोर्सच्या आठव्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोखर, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या वेळोवेळीच्या कारवाया, प्रबोधन व अन्य माध्यमातून केलेल्या कार्यवाहीमुळे जिल्ह्यात अमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्यांत घट झाली आहे, ही सकारात्मक बाब आहे. जिल्ह्यात अमली पदार्थविरोधात पोलीस प्रशासनाचा धाक आहे, हा संदेश यापुढेही कायम ठेवणे गरजेचे आहे. अमली पदार्थ विरोधी प्रबोधन स्पर्धेतील विजेत्यांना एक मे रोजी स्वतंत्र कार्यक्रमाद्वारे बक्षीस वितरणासाठी नियोजन करावे. तसेच, विजेत्यांच्या लघुचित्रफीती, जिंगल्स पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळा – महाविद्यालयांमध्ये प्रसारित कराव्यात. दैनंदिन परिपाठावेळी पठण करण्यासाठी प्रतिज्ञा व प्रबोधनगीत मे अखेर तयार करावे व वरिष्ठांच्या मान्यतेने पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही करावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यसनाधीनांचे समुपदेशन, चिकित्सा व उपचार केंद्रासाठी जागा मिळण्यासाठी प्रयत्न करून याबाबतच्या कामास गती द्यावी, अशा सूचनाही यावेळी दिल्या. त्यावर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी समुपदेशन व चिकित्सा केंद्रासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ठिकाणी जागा निश्चितीबाबत प्रयत्नरत असल्याचे सांगितले. प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी अमली पदार्थ विरोधी कार्यवाहीचा आढावा सादर केला.

महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी महापालिका क्षेत्रातील डार्क स्पॉट्सच्या ठिकाणी करावयाच्या कार्यवाहीची माहिती दिली. क्राईम टास्क फोर्सच्या कार्यवाहीचाही घेतला आढावासांगली शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमिवर अतिरीक्त पोलीस आयुक्त रितू खोखर यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन क्राईम टास्क फोर्सच्या कामकाजाचाही आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी घेतला.

या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोखर, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, सांगली शहरच्या पोलीस उपाधीक्षक विमला एम., मिरजचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा आदि उपस्थित होते.

गुन्हे नियंत्रणासाठी हा टास्क फोर्स प्रभावीपणे काम करत आहे. गुन्ह्यांची उकल वेळीच होत आहे. याबाबत समाधान व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महानगरपालिका व पोलीस विभागाने छोट्या टॉवर पोलीस चौक्यांसाठी जागा निश्चित करुन देण्याच्या कार्यवाहीला गती द्यावी. जागा निश्चित करताना तिन्ही ऋतुंचा विचार करावा. आवश्क तेथे जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येईल. तसेच, अशा घटनांतील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी न्यायालयात व्यवस्थित कागदपत्रे सादर करावीत, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button