
सांगली, ता.१८ : व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थी दशेतच जनजागृती करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा. यासाठी प्रत्येक शाळेत शिक्षकांनी प्रबोधन करावे. मुलांमध्ये व्यसनाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती होण्यासाठी शिक्षकांना दूरदृष्य प्रणालीव्दारे माहिती द्यावी व याबाबतचा परिपाठ प्रत्येक शाळेत दिनांक २० फेब्रुवारी व ११ मार्च २०२५ रोजी आयोजित करावा. या परिपाठामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. कोणीही व्यसनाला बळी पडू नये या दृष्टीने एक सामाजिक कार्य म्हणून सर्वांनी आपले सक्रिय योगदान द्यावे, तसेच प्रबोधन, परिवर्तन व पुनर्वसन या पध्दतीने सांगली जिल्हा व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करू, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या नार्को समन्वय (एनकॉर्ड) समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून घेण्याबाबत नोटीस तात्काळ बजावावी – अधीक्षक संदीप घुगे

यावेळी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी मागील बैठकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीबाबत आढावा सादर करून प्रत्येक शाळेमध्ये तक्रार पेटी ठेवण्याबाबत सूचना केली. याबाबत तशा सूचना शिक्षण विभागाने शाळांना देण्याबाबत सूचित करण्यात आले.