जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली ता.२ : जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्नसन २०२५-२६साठी एकूण ७४४ कोटी ७५ लाखांचा प्रारूप आराखडा मान्य सांगली जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून
निधीची कमतरता पडू देणार नाही. कृषि, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, नगरविकास, पर्यटन विकास, वीजपुरवठा अशा सर्वच क्षेत्रांसाठी वाढीव निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करू. लोकप्रतिनिधी व सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी परस्पर समन्वयाने काम करावे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या बैठकीत सन २०२५-२६ साठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती घटक कार्यक्रम तसेच आदिवासी घटक कार्यक्रम मिळून २२६ कोटी ५० लाख रुपयांच्या अतिरीक्त मागणीसह एकूण ७४४ कोटी ७५ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. हा आराखडा मान्यतेसाठी दि. ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार सर्वश्री अरुण लाड, इद्रिस नायकवडी, सदाभाऊ खोत, सुधीर गाडगीळ, विश्वजीत कदम, गोपीचंद पडळकर, सत्यजीत देशमुख, सुहास बाबर, रोहित पाटील, जिल्ह्याच्या पालक सचिव विनिता वेद सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.