
सांगली : प्रतिनिधी

सांगली दि. 31: अंमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा यावर अधिक लक्ष केंद्रित केले असून, याप्रकरणी पोलीस यंत्रणेने सतर्क राहावे. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणाची खोलवर चौकशी करून या प्रकरणाच्या मुळाशी जावे. अशा प्रकरणी पोलीस विभागाने कोणतीही हयगय व कोणाचीही गय करू नये. दोषींवर कडक कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.


या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेतली. अलीकडच्या कालावधीतील पोलीस विभागाच्या कामगिरीचा आढावा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सादर केला.
विटा येथील 30 कोटी अंमली पदार्थप्रकरणी पोलीस दलाच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त पालकमंत्री श्री. पाटील यांनी अभिनंदन केले. या कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, हेड काँन्स्टेबल सागर टिंगरे व नाहेश खरात यांचे पोलीस दलाच्या वतीने प्रमाणपत्र व रोख रक्कम तसेच, वैयक्तिकरीत्या कॅडबरी देऊन कौतुक केले.
प्रजासत्ताक दिनी जाहीर केल्याप्रमाणे संबंधितांचा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दहा हजार रूपये बक्षीस देऊन सन्मान केला जाईल, असे त्यांनी सांगितले.