सांगली : भाजप नेत्या नीता केळकर यांचे सुपुत्र सारंग केळकर यांची पाच जणांकडून 36 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी फिर्यादी सारंग श्रीरंग केळकर (वय २८, रा. राजनगर, चिंतामणीनगर, सांगली) यांच्या तक्रारी वरून जितेंद्र शर्मा, रूपाली शर्मा, राजेश शर्मा, अभिमन्यू बादल, विकास रात्रा (सर्व मूळ रा. कॉर्पोरेट कार्यालय, गेरगाव, सध्या रा. एअर इंडिया कार्यालयाशेजारी, गुरुग्राम, हरयाणा),या पाच संशयितांवर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
सारंग केळकर यांचे विद्युत दुचाकींचे माधवनगर रस्त्यावर त्यांचे शोरूम होते. वाहनांसाठी लागणारे सुटे भाग व वाहने या पाच जणांकडून खरेदी करत होते. फसवणुकीचा प्रकार ५ मार्च २०२१ ते २० जानेवारी २०२४ या कालावधीत घडला.
संशयीताचा ओकिनावा ऑटोटेक या कंपनीकडे दोन लाख रुपये सुरक्षा ठेव ठेवली होती. सुट्या भागांसाठी ३ लाख १३ हजार ३११ रुपये भरले होते. दुचाकी खरेदीसाठी २२ लाख ६७ हजार रुपये भरले. संशयितांनी फर्यादी ला वेगवेगळ्या बँक खात्यांचे क्रमांक दिले होते. फिर्यादी सारंग केळकर यांनी वेळोवेळी पैसे भरले. सारंग केळकर यांनी ग्राहकांना सांगलीत विक्री केलेल्या काही दुचाकींचे सुटे भाग स्वखर्चाने दिलेली रक्कम ही सुमारे ८ लाख ६ हजार ३७४ रुपये होते. पैसे व वाहनांचे सुटे भाग व दुचाकी कंपनीकडून मिळावेत, यासाठी कंपनीकडे पाठपुरावा करून मागणी केली असता; संशयितांनी या गोष्टीची दाखल घेतली नाही. या गोष्टींवरून सारंगला कळून चुकले की आपली फसवणूक झाली आहे. यावर सारंगने संजयनगर पोलिसांत धाव घेतली. एकंदरीत फसवणुक झालेली रक्कमेचा आकडा ३५ लाख ८६ हजार ६८५ रुपये होतो. अधिक तपास संजयनगर पोलीस करीत आहे.