
सांगली : आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू हिंदकेसरी पैलवान मारूती माने यांच्या कवठेपिरान येथील स्मारकातील अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. ही कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावीत, अशा सूचना कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या.
कवठेपिरान (ता. मिरज) येथे बांधण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू हिंदकेसरी पैलवान मारूती माने स्मारक समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, हिंदकेसरी पैलवान मारूती माने स्मारकातील अपूर्ण कामे सर्वोच्च प्राधान्याने करावीत. कामाच्या दर्जामध्ये कोणतीही तडजोड केली जावू नये. हिंदकेसरी पैलवान मारूती माने यांच्या पुतळ्यातील त्रृटी दूर कराव्यात. सर्व कामे महिनाभरात पूर्ण करून स्मारक हस्तांतरणाची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. यावेळी स्मारक समिती सदस्यांनी मौलिक सूचना मांडल्या. तसेच, स्मारकात हिंदकेसरी पैलवान मारूती माने यांचा हुबेहुब पुतळा उभारावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
हिंदकेसरी पैलवान मारूती माने यांच्या कवठे पिरान या मूळ गावी स्मारक बांधण्यास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. यामध्ये मुख्य इमारतीसह प्रवेश गॅलरी, हिंदकेसरी पैलवान मारूती माने यांचा पुतळा, म्युझिअम, रेस्टलिंग प्रॅक्टिस हॉल, स्वच्छता गृह, अंतर्गत रस्ते, कुंपण भिंत, प्रवेशद्वार आदि कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
स्मारक बांधकामासाठी 15 सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे. स्मारकाच्या बांधकामासाठी जवळपास 4 कोटी 90 लाख रुपयांपैकी जवळपास 4 कोटी 9 लाख रूपये निधी प्राप्त असून मुख्य इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, माजी आमदार दिनकर पाटील, निशिकांत पाटील, नामदेवराव मोहिते, विठ्ठल पाटील, भीमराव माने, रघुनाथ दिंडे, वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांच्यासह स्मारक समितीचे सदस्य उपस्थित होते.