सांगली दि. ७ : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली व त्यांच्या अधिनस्त कार्यालय व पोलीस ठाणे मध्ये १४० पदांवर प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याकरिता सोमवार, दि. ९ सप्टेंबर २०२४ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे निवड मेळावा आयोजित केला आहे.
शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. युवक, युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी या कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अहर्तप्रमाणे १२ वी पास ६ हजार, आयटीआय/पदवीका ८ हजार व पदवीधर/पदव्युत्तर १० हजार शासनाकडून विद्यावेतन दिले जाणार आहे. या कार्य प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने आहे.
तरी १८ ते ३५ वयोगटातील इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस येताना शैक्षणिक कागदपत्राच्या मुळ प्रती व दोन छायांकित प्रती तसेच Employment कार्ड, आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बॅक पासबुकच्या दोन छायांकित प्रती घेऊन उपस्थित रहावे. इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली व त्यांच्या अधिनस्त कार्यालय व पोलीस ठाणे मध्ये पुढीलप्रमाणे जागा भरावयाच्या आहेत.
- पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मिरज व अधिनस्त पोलीस ठाणे – 51
- उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मिरज व अधिनस्त पोलीस ठाणे (मिरज तालुका) – 14
- उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय इस्लामपूर व अधिनस्त पोलीस ठाणे (वाळवा व शिराळा तालुका) – 16
- उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तासगाव व अधिनस्त पोलीस ठाणे (तासगाव व पलूस तालुका) – 16
- उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय विटा व अधिनस्त पोलीस ठाणे (विटा, आटपाडी व कडेगाव तालुका) – 16
- उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जत व अधिनस्त पोलीस ठाणे (जत व कवठेमहांकाळ तालुका) – 16
- या सर्व ठिकाणी पदवीधर, टंकलेखन (मराठी 30 किंवा इंग्रजी ४० श.प्र. मि.) MSCIT या शैक्षणिक पात्रतेच्या ट्रेनी डाटी एन्ट्री ऑपरेटर / ऑफिस असिस्टंट या पदासाठी जागा भरावयाच्या आहेत.
- तसेच आयटीआय / पदवीका शैक्षणिक पात्रतेच्या बिनतारी संदेश या ठिकाणी विजतंत्री /वायरमन, तांत्रिक हेल्पर पदाच्या ७ जागा व मोटार विभाग सांगली येथे ऑटो इलेक्ट्रीक, मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, मोटार सायकल मेकॅनिक पदाची प्रत्येकी एक जागा भरावयाची आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर सांगली येथे संपर्क साधावा.