सांगलीच्या मुख्य बाजारपेठेतील समस्यांवर आयुक्तांचा ‘ऑन द स्पॉट’ प्रहार; तातडीने उपाययोजनांचे आदेश

सांगली | प्रतिनिधी, ता.२० मार्च २०२६: शहराचा हृदयभाग असलेल्या पेठभाग, सराफ कट्टा आणि कापड पेठ परिसरातील नागरी समस्यांची दखल घेत महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी (IAS) यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेत आयुक्तांनी स्वच्छता, पार्किंग आणि अतिक्रमणाबाबत कडक निर्देश दिले आहेत.

पाहणी दौऱ्यातील महत्त्वाचे निर्णय आणि आदेश:

  • स्वच्छतागृहांची सोय: सराफ कट्टा आणि भाजी मंडई परिसरात महिला व पुरुषांसाठी सुसज्ज स्वच्छतागृहे उभारण्याचे आणि जुन्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.
  • वाहतूक कोंडीवर उपाय: बाजारपेठेतील बेशिस्त पार्किंगमुळे होणारी कोंडी फोडण्यासाठी शहर अभियंता व वाहतूक शाखेशी समन्वय साधून स्वतंत्र पार्किंग जागा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या.
  • कचरा संकलन: भाजी मंडई आणि व्यापारी पेठेत साचणाऱ्या कचऱ्याचे वेळेवर संकलन करण्यासाठी मुख्य स्वच्छता अधिकाऱ्यांना विशेष नियोजन करण्यास सांगितले.
  • पावसाळापूर्व कामे: ड्रेनेज लाईन, गटारी आणि रस्त्यावरील तांत्रिक अडचणींची पाहणी करून दुरुस्ती कामांचा आढावा घेतला.

“बाजारपेठेचा विकास लोकसहभागातून करू” – आयुक्त सत्यम गांधी

नागरिकांशी संवाद साधताना आयुक्त म्हणाले, “बाजारपेठ हा शहराचा महत्त्वाचा भाग आहे. येथील पार्किंग आणि स्वच्छतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील. नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.”

या दौऱ्यात नगरसेवक राजेश नाईक, उदय बेलवलकर, अनिता पवार यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाच्या या ‘ॲक्शन मोड’मुळे सांगलीतील व्यापारी आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button