
सांगली | प्रतिनिधी, ता.२३ : सांगली-मिरज-कुपवाड शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी ‘युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर’ (UICC) तर्फे विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. महानगरपालिकेचे आयुक्त श्री. सत्यम गांधी आणि उपायुक्त सौ. स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
स्वच्छता दूतांचे आरोग्य हीच शहराची संपत्ती
शहर स्वच्छतेचा डोलारा सांभाळणाऱ्या घंटागाडी कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य सक्षम राहावे, या उद्देशाने ‘क्षमता बांधणी’ (Capacity Building) कार्यक्रमांतर्गत हे पाऊल उचलण्यात आले. या शिबिरात एकूण ११७ कर्मचाऱ्यांची सखोल तपासणी करण्यात आली.
तज्ज्ञ डॉक्टरांकडून अत्याधुनिक तपासणी
UICC च्या अनुभवी डॉक्टरांच्या पथकाने कर्मचाऱ्यांची सविस्तर आरोग्य तपासणी केली. यामध्ये डॉ. परमशेट्टी, डॉ. रियाज मुजावर, डॉ. राजीव गांधी, डॉ. टकले, डॉ. प्राची प्राणी आणि डॉ. सुरज तांबोळी यांनी सहभाग घेऊन कर्मचाऱ्यांना मोलाचा वैद्यकीय सल्ला दिला. “स्वच्छता कर्मचारी हा शहर आरोग्याचा खरा पाया आहे,” असे मत यावेळी डॉ. परमशेट्टी यांनी व्यक्त केले.
महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष तपासणीची ग्वाही

कार्यक्रमादरम्यान आयुक्त श्री. सत्यम गांधी यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासण्या आणि इतर आवश्यक वैद्यकीय चाचण्यांचा समावेश करण्याची सूचना मांडली. डॉक्टरांच्या टीमने या सूचनेचे स्वागत करत, भविष्यात या सेवा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
“स्वच्छता कर्मचारी हा शहराचा कणा” – महापौर धीरज सूर्यवंशी
नूतन महापौर श्री. धीरज सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आरोग्य व स्वच्छता विभागातील कर्मचारी हे शहर व्यवस्थेचा कणा आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, कर्मचारी निरोगी राहिल्यास शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल.”
मान्यवरांची उपस्थिती व सत्कार
याप्रसंगी महापौर श्री. धीरज सूर्यवंशी, उपमहापौर श्री. गजानन मगदूम, सभागृह नेते श्री. संदीप आवटी तसेच प्रभाग ७ चे नगरसेवक आणि नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि हॉस्पिटलचा वैद्यकीय कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावणारा आणि त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणारा हा उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.