
सांगली | प्रतिनिधी, ता.१६ : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरुद्ध प्रशासनाने आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या थेट निर्देशानुसार, आज सांगली-मिरज रोडवरील विश्रामबाग चौक (जुना जकात नाका) व दांडेकर बझार समोरील अनेक वर्षांपासून असलेल्या ६७ अनधिकृत खोक्यांवर महापालिकेने धडक कारवाई करत रस्ता मोकळा केला.
आयुक्तांच्या उपस्थितीत धडक मोहीम
अनेक वर्षांपासून या अनधिकृत खोक्यांमुळे सांगली-मिरज या मुख्य रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. या तक्रारींची दखल घेत आयुक्त सत्यम गांधी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून ही कारवाई पूर्ण करून घेतली. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी या संपूर्ण मोहिमेचे संचलन केले.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई
सदर अतिक्रमण हटवण्यापूर्वी नगररचना विभागातर्फे सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यात आले होते. उपायुक्त (सा.प्र.) श्रीमती अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगररचना सहाय्यक संचालक हणमंत मारनूर यांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतुदींनुसार सर्व ६७ खोकी धारकांना पूर्वसूचना (नोटीस) बजावली होती. मात्र, मुदतीत अतिक्रमण न हटवल्यामुळे अखेर महापालिकेने प्रशासकीय बळाचा वापर करून हे अतिक्रमण निष्कासित केले.
फौज फाटा आणि यंत्रणा सज्ज

या मोहिमेत महापालिकेच्या विविध विभागांनी एकत्रित सहभाग नोंदवला. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील, अधीक्षक श्री. मद्रासी, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, मुख्य सुरक्षा अधिकारी मुकेश मिरजकर यांच्या पथकांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आयुक्तांचा कडक इशारा
कारवाईनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आयुक्त सत्यम गांधी म्हणाले की, “शहराच्या नियोजित विकासात आणि वाहतुकीच्या प्रवाहात अनधिकृत बांधकामे हा सर्वात मोठा अडथळा आहे. यापुढेही सांगली, मिरज आणि कुपवाड परिसरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे कोणत्याही दबावाशिवाय हटवली जातील. नागरिकांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करू नये, अन्यथा जप्ती व फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल.”
नागरिकांचे स्वागत आणि पुढील सूचना
अनेक वर्षांचे हे अतिक्रमण निघाल्याने रस्ता रुंद झाला असून, वाहनधारकांनी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. दरम्यान, ज्यांना नोटिसा बजावल्या आहेत त्यांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा निष्कासनाचा खर्च संबंधित मालकांकडून वसूल केला जाईल आणि साहित्य जप्त केले जाईल, असा इशारा सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे यांनी दिला आहे.