
कुपवाड, ता.१४: सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २ मध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार आघाडी घेतली आहे. वाघमोडेनगर, कुपवाड येथे भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित ‘संवाद बैठक’ मोठ्या उत्साहात पार पडली. शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प सोडत, या बैठकीत नागरिकांनी भाजपला मोठा पाठिंबा देण्याचे आश्वासित केले.
या बैठकीदरम्यान प्रभाग २ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार सौ. प्राजक्ता सनी धोतरे, श्री. प्रकाश बाबासो ढंग, सौ. मालुश्री सागर खोत आणि श्री. प्रकाश रमेश पाटील यांच्या प्रचारार्थ जतचे आमदार गोपीचंद पडळकर हे प्रमुख उपस्थितीत राहून नागरिकांशी थेट संवाद साधला. “शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला विकासाचा रथ महापालिकेतही अधिक वेगाने धावेल,” असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकरांनी यावेळी व्यक्त केला.

बैठकीला वाघमोडेनगर परिसरातील ग्रामस्थ, महिला आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “येणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या चारही उमेदवारांना भरभरून मतदान करून बहुमताने विजयी करा,” असे आवाहन यावेळी करण्यात आले. नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, प्रभाग २ मध्ये भाजपची सत्ता येणे निश्चित असल्याचे चित्र दिसत आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीमुळे या बैठकीला मोठ्या सभेचे स्वरूप प्राप्त झाले होते. उपस्थित सर्वांनीच विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येत भाजपला पाठिंबा दर्शवला आहे.