
मिरज, ता.२९: महात्मा गांधी पोलिसांची मोठी कारवाई; अल्पवयीन मुलांकडून ₹१.२० लाखांचा गांजा जप्त. केंद्र सरकारच्या ‘नशामुक्त भारत अभियान’ आणि आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याच्या पोलीस दलाने अंमली पदार्थांच्या विरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. याचाच भाग म्हणून महात्मा गांधी पोलिसांनी सफलता मिळवली आहे.
पोलिसांची अधिक माहितीनुसार २० ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री उशिरा महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, मिरज येथील आंबेडकर उद्यानाच्या मागील बोळात दोन व्यक्ती गांजा विक्रीसाठी थांबलेले आहेत. तीची खातरजमा होताच, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदिप गुरव आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या पथकाने तातडीने सापळा रचून छापा टाकला. यावेळी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एकूण २ किलो वजनाचा तयार गांजा जप्त करण्यात आला, ज्याची किंमत अंदाजे ₹५०,०००/- आहे. तसेच, विना नंबरप्लेटची एक सुझुकी ॲक्सेस मोपेड मोटारसायकल (किंमत ₹७०,०००/-) असा एकूण ₹१,२०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली. ताब्यात घेतलेले दोन्ही संशयित हे अल्पवयीन आहेत. झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासातून कृत्य केल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदिप गुरव हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्यावतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अंमली पदार्थांच्या या अवैध धंद्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत करावी. पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवून त्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करावे आणि यासंबंधीची कोणतीही माहिती तातडीने पोलिसांना द्यावी.