
सांगली, ता.१ : व्यसनमुक्ती, नशामुक्तीसाठी, अमली पदार्थ विरोधात शाळा महाविद्यालयात प्रबोधन करण्यासाठी गीतस्पर्धा घोषणा करून, त्यासाठी ५१ हजाराचे बक्षीस राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जाहीर केले. अमली पदार्थ टास्क फोर्सच्या चौथ्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम. आय. डी. सी.) च्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यासह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अमली पदार्थ विरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये प्रार्थनेनंतर अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा, प्रबोधन गीत व व्यसनाचे दुष्परिणाम सांगणारे व्याख्यान किंवा चित्रफीत असा उपक्रम राबविण्यात येणार आहे, त्या अनुषंगाने प्रार्थनेच्या वेळी अमली पदार्थविरोधी प्रबोधन करण्यासाठी चालीसह तीन मिनिटांपर्यंत गीत सादर करण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करावी. हे गीत अमली पदार्थविरोधी आशयघन, प्रभावी, आकर्षक (कॅची) व नेमके प्रबोधन करणारे असावे. त्यासाठी परीक्षकांची नियुक्ती करावी. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या स्पर्धेची संपूर्ण कार्यवाही पार पाडावी. प्रथम पारितोषिक रक्कम रुपये 51 हजार असावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.