सांगली : प्रतिनिधी

सांगली ता.५ : एकात्मिक बाल विकास सेवा योजना मिरज प्रकल्पांतर्गत विविध महसुली गावातील अंगणवाडी सेविका ६ व मदतनीस यांची ३९ मानधनी पदे रिक्त आहेत. ही मानधनी पदे भरण्यासाठी फक्त स्थानिक रहिवासी व गुणवत्ताधारक पात्र महिला उमेदवारांकडून ज्या-त्या स्थानिक गावातील रिक्त अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र महिला उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ अखेर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प मिरज कार्यालयात सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत साक्षांकित प्रतीसह समक्ष पोहोच करावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प मिरजचे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
एकाच गावातील एकापेक्षा जास्त रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांचे ठिकाण व केंद्रासाठी अर्जदाराने इच्छुक ठिकाणचा प्राधान्यक्रम द्यावयाचा आहे, तथापि अंतिम निवड करण्याचे अधिकार हे निवड समितीकडे राखून ठेवण्यात आले आहेत.

या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर अनुषंगिक पात्रता या बाबतचा सविस्तर तपशील दर्शवणारा नमुना अर्ज संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध आहे.
